नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022: मुंबई 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू झाला आहे. डॉन छोटा चकीलचा जवळचा म्हटला जाणारा सलीम गाझी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. गाझी हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य गुन्हेगार होता जो हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि इतर साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तो सतत आपला ठावठिकाणा बदलत असे. तो दुबईतही राहत होता आणि त्यानंतर पाकिस्तानमधील छोटा शकीलच्या बेकायदेशीर कारवायांमध्ये सक्रिय भूमिका बजावत होता.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी त्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. मुंबई बॉम्बस्फोटात सलीम गाझीशिवाय छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग होता. त्या हल्ल्यात सुमारे 250 लोक मारले गेले आणि 600 हून अधिक जखमी झाले. सध्या हे सर्वजण कराची किंवा यूएईमध्ये लपले आहेत.
सलीम गाझीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील होती, त्याला पकडण्यासाठी इंटरपोलकडून प्रयत्न केले जात होते, परंतु तो आपला ठावठिकाणा बदलत असल्यानं तो एजन्सीच्या तावडीतून बाहेर राहिला. त्याच रणनीतीखाली त्याचे अन्य साथीदारही फरार आहेत. 2008 मध्ये नेपाळने दोघांना अटक केली असली तरी ते सलीम गाझी आणि रियाझ खत्री असल्याचं सांगण्यात आलं. मात्र तपासाअंती ते इनपुट चुकीचं असल्याचं सिद्ध झाल्यानं एजन्सीचे हात रिकामे झाले.
छोटा शकीलबद्दल सांगायचे तर, गेल्या काही वर्षांत त्याचे अनेक जवळचे मित्र हे जग सोडून गेले आहेत. सलीम गाझीच्या आधी फहीम मचमचचाही गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. तो छोटा शकीलच्याही जवळ होता आणि त्याचे अवैध धंदे पुढं करत होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे