समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र – १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

पूर्वाश्रमीचा परिवार
समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्‍नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव ‘राणूबाई ‘ होते.

बालपण
समर्थ रामदासस्वामी(नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. . लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर त्याने दिले होते.या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी “सावधान” हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.

तपश्चर्या आणि साधना
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.

नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.

समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण

तुम्हास जगोद्धार करणे आहे /तुमची तनु ते आमुची तनु पाहे /दोनी तपे तुमची रक्षिली काय हे /धर्मस्थापनेकारणे //
समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘

शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास
भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले – ” आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?” तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले – ” एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी”. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले – “आणि हा सारा फौजफाटा ?” त्यावर हरगोविंद म्हणाले – ” धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे , केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.’समान-शीले-व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले…. त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत.”समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा