गोल पोस्ट राजकारण “समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”; भरसभेत नवाब मलिकांचे आव्हान

“समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”; भरसभेत नवाब मलिकांचे आव्हान

मुंबई, 22 ऑक्टोंबर 2021: आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबी प्रमुख समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आर्यन खान च्या प्रकरणानंतर या दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांचा हा सामना आणखीनच वाढलेला दिसत आहे. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले असताना आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे हा एक नंबरचा बोगस माणूस आहे. ‘एनसीबी’च्या (NCB) माध्यमातून भाजपवाल्यांसाठी हजारो कोटींच्या वसुलीचा धंदा त्यांनी चालवला आहे. या सगळ्याचे पुरावे देऊन वानखेडेंची नोकरी घालवल्याशिवाय आणि त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय मी थांबणार नाही,’ असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय.
करोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.
यापूर्वी देखील नावाब मलिक यांच्या जावयांवर एनसीबीने कारवाई केली होती. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक होऊन साडेआठ महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला होता. दरम्यान नुकतीच त्यांचा जावई खान यांना जामीन मंजूर झाला आहे. समीर खान यांना बोगस प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
 माझ्या जावयावरचे आरोप कोर्टात सिद्धच होऊ शकले नाहीत. त्याच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मात्र, मला त्रास देण्यासाठी व राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी माझ्या जावयाला जामीन मिळू दिला नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ‘हे सगळं कटकारस्थान भाजपवाल्यांचं आहे. नटनट्यांवर बोगस गुन्हे दाखल करून हजारो कोटींची वसुली करण्याचा धंदा सुरू आहे. आम्ही हे सिद्ध केल्याशिवाय थांबणार नाही,’ असं मलिक म्हणाले.
“मी वानखेडेंना आव्हान देतो वर्षभरात त्यांची नोकरी जाईल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकायला पुढं आले होते. आता देशातील जनता तुम्हाला तुरुंगात जातांना बघेल. तुम्ही कीती बोगस माणूस आहात याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आगामी काळात ते पुरावे आम्ही बाहेर काढणार आहोत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर वरुन दबाव होता, असे वानखेडे सांगतात. पण आता नवाब मलिक कुणाच्या बापाला घाबरत नाही”, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version