संचारबंदीचे आदेश मोडल्या प्रकरणी जेजुरीत तीघांवर गुन्हा दाखल.

पुरंदर, दि. २४ मे २०२०: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. तरी देखील लोक जिल्हाबंदीचा आदेश मोडून पुणे जिल्ह्यात येत आहेत. काल जेजुरी पोलिसांनी बेकायदा प्रवास करणाऱ्या तीघांवर संचार बंदीचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सचार बंदीचे आदेश दिले आहेत. बेकायदा प्रवास करून दुसऱ्या जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात येणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. काल मुंबई वरळी येथून आपल्या मूळगावी निघालेल्या दोघांना व त्यांना आपल्या वाहनातून सोडण्यास निघालेल्या टेम्पो चालकाला जेजुरी येथील चेक नाक्यावर आडवून चौकशी केली असता ते विनापरवाना प्रवास करीत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी महफुज झाकीर हुसेन (३२) रा.चेंबूर,मुंबई, सुरेखा प्रमोद कांबळे (४७), आकाश प्रमोद कांबळे (२०) दोघे रा.वरळी मुंबई यांच्यावर कलम १८८,२६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील सुरेखा कांबळे व आकाश कांबळे यांना कवडेवाडी येथील प्राथमिक शाळेत कॉरंटाईन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन लोकांनी करावे, आदेशांचे उलंघन करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा