खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद दलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने हाका मारीत असे. त्यांच्या लहानपणीच्या छोटया मोठया प्रसंगातून आईने त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम केले आहे. याच विचारातून त्यांच्या हातून श्यामची आई नावाचे प्रसिद्ध साहित्य निर्मिले गेले. ज्यातून श्याम म्हणजे साने गुरुजी कसे घडले ? याची प्रचिती येते.
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला; तो शेवटपर्यंत मिळाला नाही.. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.