दिवाळीच्या सुरुवातीलाच सांगलीत दोन धक्कादायक हत्याकांडांनी खळबळ उडवली आहे. संजयनगर आणि कारखाना परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर तासगावात मुलानेच आपल्या आईची हत्या केली आहे.
संजयनगर भागात दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मित्रांनी मिळून एका तरुणाची हत्या केली. ही घटना शनिवार, मध्यरात्री साडेबारा वाजता माधवनगर रोडवरील वसंतदादा औद्योगिक वसाहत परिसरात घडली. रोहित लक्ष्मण आवळे (वय 24, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रोहित आवळे शुक्रवारी रात्री आपल्या मित्रांसोबत वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या इमारतीत दारू पित होता. यावेळी किरकोळ वाद झाल्यानंतर संतापलेल्या मित्रांनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाले.
दरम्यान, तासगावातील इंदिरानगर झोपडपट्टीत आणखी एक भीषण घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या क्षुल्लक कारणावरून जगणु उर्फ जगण्या चरण पवार (वय 45) या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची तलवारीने वार करून हत्या केली. मृत महिलेचं नाव शांताबाई चरण पवार (वय 70) असं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या सलग दोन हत्याकांडांमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































