खडतर परिस्थितीवर मात करून सानिया कारंडे पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती

पुणे २८ सप्टेंबर २०२४ : घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच, जन्मदाते वडील आणि लहान भाऊ काळाने हिरावून घेतलेले. आईने आपल्या लेकरांना कसेबसे मोठे केले, त्यांच्या शिक्षणासाठी त्या धडपडत राहिल्या, अशा या खडतर परिस्थितीवर मात करून बारामती तालुक्यातील मोराळवाडी, मुर्टीच्या सानिया कारंडेने पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती होत यशस्वी झेप घेतलीय.

सानियाचे आईवडील शेती करायचे, सानिया सर्वात मोठी, तिला दोन बहिणी व एक भाऊ होता. सानिया ७ वर्षांची असताना वडिलांचे अपघाती निधन झाले. १२ वर्षीय लहान भावाचा गंभीर अश्या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे बालपणीच आईसोबत कुटुंबाला आधार देत सानिया मोठी झाली. असंख्य संकटांवर मात करत मोलमजुरी करून आईने सानिया आणि तिच्या बहिणींना प्राथमिक शिक्षण दिले. त्यानंतर उच्च शिक्षणाची जबाबदारी आजी-आजोबा, चुलते, मामा-मामी यांनी उचलली. सानियाच अधिकारी होण्याचं स्वप्न होत, मात्र शिक्षण घेत असताना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे लवकरात लवकर नोकरी मिळवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याने सानियाने २०२२ला मुंबई पोलीस दलात भरतीसाठी अर्ज सादर केला. पहिल्याच प्रयत्नात सानिया गुणवत्ता यादीत बसली, पण वय कमी या कारणास्तव तिला प्रतीक्षा यादीत वाट पहावी लागली. त्यामुळे यशानं पुन्हा हुलकावणी दिली आणि तीच्या पदरी अपयश आलं.

खचुन न जाता तीने पुन्हा २०२४ साली पुणे ग्रामीण पोलीस दलात भरतीसाठी अर्ज केला. सानिया ने शारीरिक चाचणी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली मात्र लेखी परीक्षेच्या आदल्या दिवशीच तापाने फणफणल्याने तीला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. मात्र न डगमगता हाताला सलाईन लावून तिने परीक्षा दिली आणि अखेर यश संपादन करत सानिया पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती झाली. या यशाचे श्रेय ती तिची आई, आजी-आजोबा, मामा- मामी, प्रशिक्षक गोळे सर, प्रवीण ढेपे सर तसेच तिला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या कर्चे आणि कारंडे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला देते. सध्या सानियाची एक बहीण आरोग्य निरीक्षक पदासाठीचे शिक्षण घेत असून दुसरी बहीण उच्च शिक्षण घेत आहे. या तिघींचं भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न असून ते त्या पूर्ण करतील अशी आशा त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी : शुभम केसकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा