चांद्रयान मोहिमेला जळगावच्या सुपुत्रांचे इंधनरुपी बळ, संजय देसर्डा यांची द्रवरुप इंधन निर्मितीत प्रमुख भूमिका

जळगाव, १७ जुलै २०२३: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान-३ मोहिमेत, जळगाव जिल्ह्यातील हातेड येथील संजय गुलाबचंद देसर्डा यांनी द्रवरुप इंधननिर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडली. चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद देसर्डा यांचे सुपुत्र संजय हे, गेल्या २० वर्षांपासून इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

चंद्रयान-३ साठी त्यांनी द्रवरुप इंधनावर काम केले. पोएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि नुकतेच प्रक्षेपित झालेले यान एलव्हीएम ३ मध्ये द्रवरूप इंधन लागते. यात इस्त्रोकडून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून जैन यांना जबाबदारी देण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी मंगळयान, चंद्रयान-२, चंद्रयान-३ सह याव्यतिरिक्त अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

जैन फार्म फ्रेश फूड्सच्या करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, प्लास्टिक पार्क येथील कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरमल देसर्डा आणि जैन फूड पार्क येथे कार्यरत छगनमल देसर्डा यांचे संजय हे पुतणे आहेत. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व कंपणीतर्फे संजय देसर्डा यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा