पुणे महापालिका आयुक्त बदलावा, संजय काकडेंची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

पुणे,३० जुलै २०२३ : पुण्यात भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक दिग्गज नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी भाजपचे फक्त ३० ते ३२ नगरसेवक उपस्थित होते. यावरुन भाजप नेते संजय काकडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त बदलण्याची मागणी केली.

या वेळी काकडे म्हणाले कार्यक्रमाला शहरातील फक्त ३० ते ३२ नगरसेवक आहेत. सगळे नगरसेवक का येत नाहीत? शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आता विचारले पाहिजे. शहरातील नगरसेवकांची कामे होत नाहीत. जर कामे होत नसतील तर निवडून कसे येणार? १० वेळा कामासाठी जावे लागते. अधिकाऱ्यांकडून हेटाळणी केली जातेय. आपल्या नगरसेवकांची कामे झाली पाहिजेत. त्याची जबाबदारी ही धीरज घाटेंची आहे, असे संजय काकडे म्हणाले.

यावेळी संजय काकडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बदलीची मागणी थेट पालकमंत्र्यांसमोर केली. आयुक्तच बदला नाहीतर आयुक्तांकडून कामे करून घ्या. नगरसेवकांचीच कामे होत नसतील तर सत्ता असून नसल्यासारखे असेल, असे परखड मत संजय काकडे यांनी मांडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा