मुंबई, ३१ जुलै, २०२२: रविवारची सकाळ ही संजय राऊतांसाठी अभद्र सकाळ ठरली आहे. राऊतांच्या घरी ईडीचं पथक पोहोचलं. सकाळी साडे सात वाजल्यापासून पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीचे दहा अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले आहेत. राऊतांच्या घराबाहेर सीआरपीएफचा बंदोबस्त आहे. राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या घोषणा देत आहेत. ईडीकडून संजय राऊतांना अटक होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचीदेखील चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांनी ईडीला चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीची टीम अखेर राऊतांच्या घरी पोहोचली. अनेक वेळा राऊतांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आले. पण त्या समन्सला कुठलेही उत्तर न दिल्याने अखेर ईडीने ही कारवाई केली.
यावर संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगितलं आहे की, या घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. असे त्यांनी निक्षून सांगितले. माझ्याविरोधात खोटे पुरावे गोळा करुन ही कारवाई करण्यात आली. मी निर्दोष आहे. असंही त्यांनी सांगितलं.
यावर भाजप आता आक्रमक झाले. राऊत असेही किरीट सोमय्यांच्या रडारवर असल्याने आता सोमय्यांना आयते कोलीत हातात मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी आरोप होण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यावी. बाळासाहेबांची नको, असं खोचक विधान कदम यांनी केलं आहे. शिवसेना संपवण्याचं काम राऊतांनी केलं. जर त्यांनी भ्रष्टाचार केला नाही, तर त्यांना घाबरण्याचं काय कारण? असा सवालही त्यांनी राऊतांना खुलेआम विचारला आहे. संजय राऊतांच्या पापांचा घडा भऱला आहे. तो आता फुटणारच, असं नवनीत राणा यांनी म्हंटलं आहे. तुम्हाला बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार नाही, तो तुम्ही आधीच गमावला आहे, असे शिंदे गटातल्या शिरसाट यांनी राऊतांबद्दल वक्तव्य केलं आहे.
एकुणातच आता ईडीच्या कारवाईमुळे विरोधकांना टीका करण्यासाठी समोरुन संधी चालून आली आहे. आता ईडी काय अँक्शन घेणार, राऊत स्वत:ला कसे निर्दोष ठरवणार, हे पाहणं गरजेचं ठरेल. कारण यावर राजकारणाची नव्हे शिवसेनेची पुढील गणिते अवलंबून आहे, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस