संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

5

मुंबई, ६ जानेवारी २०२३ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. दरम्यान, ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात जातील की काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारही महाराष्ट्रातून काय काय हिरावून नेईल ते बघाच असा इशारा देखील केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला एक चॅलेंज दिला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत शिंदे फडणवीस सरकारला इशारा केला आहे.

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आधीच केली होती.तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे.आनंदच आहे…शिंदे फडणविस सरकारने बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करावी. गरज आहे. पहा जमतंय का.”, असे म्हटले आहे.

अरविंद सावंतांचा काय इशारा ?

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावरून काय काय घेऊन जातात ते पाहाच. गुजरातमध्ये उद्योग गेले आता योगी आदित्यनाथ आले. ते आता महाराष्ट्रातून काय काय घेऊन जाणार कुणास ठाऊक? महाराष्ट्र आणि मुंबईचा खच्चीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार साथ देत आहे आणि हे खूप दुर्दैवी आहे, अशी खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, लखनऊ येथे दहा ते बारा फेब्रुवारी या काळात ‘ग्लोबल इन्वेस्टर समिट’ पार पडणार आहे. त्यामुळे यूपी सरकार देशातील मोठ्या उद्योजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत आहे. त्यामुळे योगी मुंबईत येऊन मुंबईतील उद्योजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा