मुंबई, २५ फेब्रुवारी २०२३ :एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला. फडणवीस यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी करण्याचा छंदच आहे, असा टोला लगावला आहे. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यात खूप फरक आहे, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी करण्याची सवय लागली आहे. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात फरक आहे. त्यांना स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याचा छंद का जडला मला माहीत नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो. चर्चा करत असतो. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडत असताना फडणवीस विरोधी पक्षनेते होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. असा स्थितीत उद्धव ठाकरे फडणवीसांशी बोलले असतील.बोलू शकतात. फडणवीस इतक्या दिवसानंतर सनसनाटी निर्माण करून काय साध्य करू इच्छितात ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
- सनसनाटीचा आनंद घ्या
उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती ना. आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. किती काळ उपमुख्यमंत्री राहाल हे सांगता येत नाही. दिल्ली की मर्जी है ये. ठिक आहे. सनसनाटी एन्जॉय करा, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.