मुंबई , ६ जानेवारी २०२३ : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढले असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.
किरीट सोमय्या यांनी या संदर्भात ट्विट करत ही माहिती दिली. सातत्याने गैरहजर राहिल्याने शिवडी कोर्टाने संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
- नेमके काय आहे प्रकरण ?
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. शंभर कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता.
- संजय राऊत काय म्हणाले?
न्यायालयात हजर राहू शकलो नाही याबाबत खेद आहे. हायकोर्टात एक विषय होता, तिथून येथे येण्यास ट्राफिक होते, म्हणून पोहोचू शकलो नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, ईडीच्या कोठडीतून संजय राऊत नुकतेच सुटून आले आहेत. सुटून आल्यानंतरही त्यांनी सरकारविरोधात आगपाखड सुरू ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊत पुन्हा तुरुंगात जातील, असा इशारा सत्तेमधील अनेक नेत्यांनी दिला आहे. त्याचपार्श्वभूमीवर कोर्टाने त्यांना अजामीनपत्र वॉरंट पाठवल्याने संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.