पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास श्रीक्षेत्र आळंदी सज्ज झाले आहे. या दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले असून, वारकऱ्यांना यंदाच्या कार्तिकी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण आरोग्यसेवा देणार आहे. शिवाय ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीसह शहरात इतरत्र चार ठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य सुविधा सुसज्ज ठेवणार असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव यांनी दिली.
साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे २० कर्मचारी आणि १२ स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. परिचारिका, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असे एकूण ५० जादाचे कर्मचारी वारी काळात वारकऱ्यांना चोवीस तास वैद्यकीय सेवा पुरविणार आहेत.
सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिकाही प्रमुख चौकांत वारकऱ्यांना तत्काळ उपलब्ध होतील अशा ठिकाणी उभ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या वतीने आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.