पैठण, ११ जून २०२३ : पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यासाठी पैठण पंचक्रोशीतून श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रस्थान झाला असून पहिला मुक्काम चनकवाडी या गावात झाला. त्यानंतर आज सकाळी दुसऱ्या मुक्कामासाठी हातगाव येथे पालखी मार्गस्थ झाली असताना पैठणच्या दादेगावमधील गावकऱ्यांनी पाळखी अडवली.
पैठण तालुक्यातील जुने दादेगाव या गावातील पालखी मार्ग खराब असल्यामुळे यावर्षी नाथांचा पादुका सोहळा गावात येणार नाही, असा निर्णय पालखी पंच कमिटीने गावकऱ्यांना अगोदरच कळविला होता. मात्र येथील ग्रामस्थांनी सकाळी जवळपास दोन तास नाथांची पालखी मार्गावर रोखून धरली होती.
पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले व गावकरी पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, संजय मदने, मनोज वैद्य यांनी मध्यस्थी करून चर्चा घडवून आणली. त्यानंतर पुढील वर्षी ग्रामस्थांनी गावाबाहेर विसावा ओटा निर्माण करुन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे पालखी सोहळ्याच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर नाथांच्या पादुका रथ पुढे जाण्यास मार्गस्थ झाला.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर