संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान, त्र्यंबकेश्वर प्रशासनाकडून जैयत तयारी

नाशिक, २ जून २०२३ : आषाढी एकादशीचा सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी आज श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचे दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. जवळपास पंचवीस हजाराहून अधिक वारकरी, भाविक या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. वर्षभर पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागलेली असते. विठुरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची पाऊले आज पंढरीच्या दिशेने चालू लागणार आहेत. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, चांदीच्या रथातून पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून पंचवीस हजार वारकरी या सोहळ्यात सामील होण्याचा अंदाज आहे. यावर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरातील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे. या महानिर्वाणी आखाड्यात गुरु गहिनीनाथांची समाधी असल्याने इथे पहिला मुक्काम होणार आहे. यंदा जवळपास ४५ दिंड्या आणि हजारो वारकरी पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून जिल्ह्यात वारकऱ्यांसाठी बारा फिरती शौचालये आणि पाच पिण्याच्या पाण्याचे टँकर प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला होणार आहे. तर संत निवृत्तीनाथांच्या पालखीला निरोप देण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यातील भाविक, वारकरी देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसाठी सात वर्षांपूर्वी, सुमारे एक कोटी रुपये खर्च करून यापूर्वीच्या विश्वस्त मंडळांने चांदीचा रथ तयार केलेला आहे. यंदा या रथाला झळाळी देण्यात आली असून आज दुपारी हा रथ बाहेर काढला जाणार आहे. फुलांच्या सजावटीसह आकर्षक अशा रथाला सर्जा राजाची जोडी सोबतीला असणार आहे. न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा