संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव: पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक शहरात दाखल

नाशिक,(दिंडोरी) १७ जानेवारी २०२३: महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी येत्या १८ जानेवारीच्या पौषवारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक दिंड्यांसह नाशिकच्या वेशीवर पोचल्या असून, त्र्यंबकनगरीकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे नाशिक शहरांतले रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले आहेत.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या यात्रा बंद होत्या. परंतु यंदा सर्व धार्मिक क्षेत्रातील यात्रा सुरु झाल्याने पुन्हा एकदा घराघरांतून भक्त त्र्यंबकवारीसाठी बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून हजारो दिंड्या नाशिक शहारात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या दिंड्यामध्ये स्थानिक गायक, वादक, टाळकरी सहभागी झाले आहे.

  • समस्त वारकरी पौष महावारी पर्वणीसाठी सज्ज

वारकरी संप्रदायचे प्रमुख नवनाथ महाराज शेलार यांनी सांगितले की, यंदा प्रत्येक दिंडीमध्ये भव्यदिव्य रथ, चोपदार, तुळसीधारी महिला, वासुदेव सहभागी झाल्याने दिंड्यांविषयी जनतेच्या मनात आकर्षण निर्माण झाले आहे. यंदा त्र्यंबकनगर विविध दिंड्या आणि असंख्य भक्तांनी उजळून निघणार आहे. या पौष महावारी पर्वणीसाठी आम्ही समस्त वारकरी सज्ज झाले आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत दिंडीचालक बोराळे देखील उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर