संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरु ‘ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘ पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. वि. का. राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे. संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात, “संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय” ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला आहे.
जीवन
तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते.
त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले (की आंबिले?) आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता.
तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..
तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.
सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केलाव मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले.. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.
समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले.
संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.
संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत.
वंशावळ
विश्वंभर आणि आमाई अंबिले यांना दोन मुले – हरि व मुकुंद
यांतील एकाचा मुलगा विठ्ठल
दुसऱ्याची मुले – पदाजी अंबिले, शंकर अंबिले, कान्हया अंबिले
संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आणि वसतीस्थान, देहूगाव
बोल्होबा आणि कनकाई अंबिले यांना तीन मुले – सावजी (थोरला). याने तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले. मधला तुकाराम व धाकटा कान्होबा
जीवनोत्तर प्रभाव
संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते
तुकारामांनी लिहिलेली पुस्तके
गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा “गीतगाथा” हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन् शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.
संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत.
महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे ज्यू बहुजनांच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. देव-धर्म प्रथेपुढे समाज गांजलेला होता. अंधश्रद्धेने सारा समाज पोखरला होता. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत – ज्ञानेश्वर – या काळामध्ये पुढे आला. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.
ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.
संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला विरोधक नमले परंतु अभंग, अभंग राहिले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे. त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते.त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर त्यांची पत्नी रमाबाई हरी आणि मुकुंद अशी त्यांची दोन मुले ही दोन मुले लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी व दाजीचा शंकर, शंकर चा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा आणि बोल्होबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे. संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे. संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले.