Sant Tukaram Maharaj Palakhi procession 2025: आषाढी वारीच्या तोंडावर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना, देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानने एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. पालखी मार्गावर सुरू असलेले पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम पालखी सोहळ्याच्या किमान आठ दिवस आधी थांबवण्यात यावे, अशी मागणी देवस्थानने पालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे. भाविकांना सोहळ्यादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, हा या मागणीमागील मुख्य उद्देश आहे.
या मागणीसोबतच, महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालखी सोहळ्याविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी महाद्वार, मंदिर परिसर, दर्शनबारी, पालखीचा पहिला मुक्काम असलेला इनामदार वाडा, कापूर ओढा समाज आरती स्थळ (अनगडशहा वली बाबा दर्गा) परिसर आणि संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली.
यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे आणि उमेश महाराज मोरे उपस्थित होते.
पालखी सोहळ्याचे नियोजन आणि काही महत्त्वपूर्ण सूचना:
संत तुकाराम महाराजांचा ३४०वा पायी पालखी सोहळा येत्या १८ जून रोजी दुपारी प्रस्थान करेल. या सोहळ्याच्या
यशस्वीतेसाठी काही सूचनांवरही चर्चा झाली
- चिंचोली येथील पादुका स्थळावर आणि शनी मंदिराजवळ दुसऱ्या समाज आरतीसाठी पालखी थांबते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात, ज्यामुळे भाविकांना अडचण होते. त्यामुळे या ठिकाणी वाहने उभी करू नयेत, अशी सूचना देण्यात आली.
- विश्वस्त मंडळाने महाद्वारातून ३९५ दिंड्यांना प्रवेश देण्याची विनंती केली आहे. दिंडीसोबत असणारे भाविक वारकरी महाद्वारातून प्रवेश करून नारायण महाराज समाधी दरवाजाने प्रदक्षिणा घालून बाहेर पडतील. दरम्यान, भाविकांना दर्शनबारीतून मुखदर्शन चालू ठेवण्यास सांगितले आहे.
- इनामदार वाड्यात पालखी प्रस्थानानंतर पहिल्या मुक्कामासाठी जात असताना प्रवेशद्वार लहान असल्याने गर्दी टाळण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. तसेच, अनगडशहावली दर्गाजवळ पहिल्या समाज आरतीसाठी पालखी थांबते, तिथे स्थानिक भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवून पालखी गावातून बाहेर पडत असताना भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
या सर्व नियोजनासाठी पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांनी चर्चा केली असून, पालखी सोहळ्यासाठी कशा प्रकारे बंदोबस्त तयार करायचा यावरही विचारविनिमय करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर