बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्याकांड: आरोपींना फाशीची मागणी, आझाद मैदानात आक्रोश मोर्चा

72

बीड २६ जानेवारी २०२५ :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ठिकठिकाणी मोर्चे व आंदोलन होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे . या मोर्चादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबा सोबत चर्चा करत त्यांनी त्यांची बाजू समजून घेतली आणि संतोष देशमुख याच्या मारकऱ्यांवर कटोर कार्यवाही सरकारकडून केली जाईल याची हमी देखील बोलत असताना त्यांनी दिली प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, “या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून आंधळे नावाचा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आरोपी वाल्मिक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर हत्या (302 कलम) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणातील कोणताही आरोपी सुटणार नाही, पोलिसांनी पुरावे मिळवले आहेत, त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा होईल याबाबत खात्री आहे.”

आठवले यांनी कुटुंबीयांसोबत चर्चा करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. “आरोपींना कठोर शिक्षा मिळवण्यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतली आहे. हा प्रकरण अत्यंत गंभीर असून आरोपींना फाशीशिवाय पर्याय नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा
या प्रकरणाच्या तपासादरम्यान महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, “धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग दिसून येत नाही. मात्र वाल्मिक कराड यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध असल्याचे दिसते. राजीनाम्याची मागणी ही राजकीय कारणांवर आधारित आहे. नैतिकतेच्या दृष्टीने त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यास योग्य ठरेल, मात्र हा निर्णय अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर अवलंबून आहे.”

आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, जनतेचा आक्रोश
संतोष देशमुख हत्याकांडाने समाजात मोठ्या प्रमाणावर संतापाची भावना निर्माण केली आहे. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. आझाद मैदानातील आक्रोश मोर्चाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळाले.

संतोष देशमुख हत्येतील आरोपींना शिक्षा मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात जलदगतीने तपास करून सर्व पुरावे गोळा केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड अद्याप फरार असल्याने त्याचा शोध लागणे महत्त्वाचे ठरत आहे.

राजकीय स्तरावरही या प्रकरणाची चर्चा सुरू असून आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी प्रबळ आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि समर्थक न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे