राजगुरूनगर, दि.२५ मे २०२०: कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यादरम्यान आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून व संयम पाळून सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले.
कोणतीही गर्दी होणार नाही असे कार्यक्रम टाळून मुस्लिम बांधवांनी तराविहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदि धार्मिक विधी घरीच केले. आता अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने तसेच राज्यातील लॉकडाऊन सुरू असल्या कारणाने रमजान ईदची नमाज ही घरीच पठण केली. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे अशी सर्वांनी प्रार्थना केली. गर्दी न करता व प्रत्यक्ष गाठीभेटी न घेता मोबाइल वरूनच नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना शुभेच्छा द्याव्यात असे दावडी मुस्लिम समाज ट्रस्ट, पोलीस पाटील व ग्रामपंचायत दावडीच्या वतीने विनंती करण्यात आली. त्याचे समाजबांधवांनी काटेकोर पणे पालन केले.
समाज बांधवांनी नियमांचे पालन केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दावडी बीटचे पोलिस अंमलदार घोडे , दावडी गावचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, युवा नेते हारूनभैया शेख ,अल्ताब इनामदार,राजूभाई मूलाणी व मौलाना शहादत शेख उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी -सुनिल थिगळे