तांदुळवाडी;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा सर्वात जास्त प्रभाव हा मजुरांवर होताना दिसत आहे. या परिस्थितीत सर्वच जण गंभीर समस्येला तोंड देत असले तरी हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची परिस्थिती ही जास्त बिकट होताना दिसत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी भटकणारे एकूण १४ मजूर परभणीवरून ट्रॅक्टरद्वारे रातोरात आपल्या गावाकडे जात असताना त्यामध्ये एक स्त्री ही गरोदर होती. त्या महिलेला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्याने त्यांना तांदूळवाडी ता. कळंब जि.उस्मानाबाद येथील एका ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रस्त्याच्या कडेला संजय जयराम अडसूळ यांची शेती आहे.
त्या अवघडलेल्या मजूरांची विनंती मान्य करत संजय अडसूळ यांनी त्यांच्या शेतात त्या मजूरांना आसरा दिला. काही क्षणातच त्या गरोदर महिलेने एका मुलीला जन्म दिला.
त्यानंतर तांदूळवाडी येथील सरपंच दिपाली नितीन काळे ग्रामसेवक यु.एन.झगडे तसेच पोलीस पाटील आशा ताई आणि त्यांचे सहकारी यांनी त्या महिलेची डॉक्टरांकडून तपासणी करून त्या महिलेला विलगीकरण करून स्थानिक शेतकरी संजय जयराम अडसूळ यांच्या शेतामध्ये ठेवण्यात आले.
त्यांना आज ११ मे रोजी सरपंचांनी स्वखर्चाने १४ दिवस पुरेसे होईल अशी धान्य कीट देखील दिली. तसेच लहान बाळासाठी लागणारे साहित्य कीट ही दिले. जर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे तुम्हाला आढळून आली तर त्वरित कोरोना कक्षाशी व आशा ताई यांच्याशी संपर्क साधावा अशा सूचना त्यांना सरपंच दिपाली नितीन काळे यांनी दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड