सरपंचांनी जिंकला विश्वास, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा अविश्वास ठराव रद्द..!

9

उरुळी कांचन, दि. १८ जुलै २०२० : रोजी उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे यांच्या विरोधात आठ ग्रामपंचायत सदस्यांनी गेल्या सोमवारी अविश्वास ठराव हवेलीचे तहसीलदार सुनिल कोळी यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. सरपंच वनारसे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर सोमवारी दि. २० जुलै रोजी हवेलीचे तहसीलदार यांनी गुरुवारी सदस्यांना मिटींग संदर्भात नोटीसा पाठवल्या होत्या व हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी असे सांगितले की, उरळीकांचन सरपंचांच्या विरोधात ठराव तहसील प्रशासनाने दाखल करून घेतला असला तरी यावर काय निर्णय घ्यायचा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी विचारणा केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसारच सदस्यांना नोटीस पाठवल्या होत्या व शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाने आपला पूर्वीचा आदेश फिरवल्याने राजश्री वनारसे यांच्यावरील अविश्वास ठरावाची प्रक्रिया रद्द केलेली आहे. सरपंच राजश्री वनारसे असे म्हणाल्या की राज्य सरकारच्या ५ मार्च २०२० च्या शासन सुधारणा पत्रातील आदेशानुसार हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांना अविश्वास ठराव दाखल करून घेता येत नसतानाही कोळी यांनी अविश्वास ठराव दाखल करून घेतला ही बाब चुकीची आहे.

तहसीलदार कोळी यांच्या कार्यालयाचा गलथानपणा की राजकीय षडयंत्र होते याची चौकशी होणे गरजेचे आहे. तहसीलदार सुनील कोळी यांच्यावरील आदेशाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याची कुणकुण लागताच कोळी यांनी अविश्वास ठरावावर चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अविश्वास ठरावावर चर्चा रद्द झाल्याने न्याय मिळाला असला तरी नेमका गलथानपणा झाला की केला ही बाब नागरिकांच्या समोर येणे गरजेचे आहे. असे “न्यूज अनकट” शी बोलताना राजश्री वनारसे यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे