- तुम्ही राजकारण करून, समाजावर उपकार करत आहात या भावनेतून आधी बाहेर या. तुम्हाला सत्तेची, पदाची, कार्यकर्ते मागे फिरावेत याची हौस आहे म्हणून तुम्ही राजकीय क्षेत्रात आलात हे ध्यानात ठेवा.
- केलेलं काम स्वतःची टिमकी वाजवून सांगायची हौस खूप वाईट असते. तसंही तुम्ही जनतेच्या पैशातून काम करता, त्यामुळे त्यात तुमचा मोठेपणा कमी आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा मोठा हिस्सा आहे. 2 रुपयांचा पारले-जी विकत घेणारा भिकारीसुद्धा अप्रत्यक्ष कर भरत असतो. त्यामुळे त्याच्या पैशावर स्वतःची जाहिरातबाजी करणे हे हास्यास्पद असते.
- “मी जमिनीवर काम करतो” म्हणून अहं बाळगू नका. इथे बाकीचे लोक अंतराळात राहत नाहीत. दुकानात पुडी बांधणाऱ्या पोरापासून ते एखाद्या मोठ्या कंपनीच्या CEO पर्यंत सगळेच जमिनीवर काम करतात. आणि त्या प्रत्येकाच्या चांगल्या कामाचा फायदा देशास होत असतो. तुमच्या एकट्याचे कार्य नेत्रदीपक किंवा समाजावर उपकार करणारे नाहीये.
- तुम्ही जर पारंपरिक राजकारणी कुटुंबातुन येऊन जर टँकर पुरवले, औषधे पुरवली, रस्ते बांधले, अन्न पुरवले वगैरे भोंगे वाजवत असाल तर थोडी लाज वाटू द्या. आधी घरी जाऊन आपल्या आधीच्या राजकीय पिढ्यांना विचारा की त्यांनी दशकानुदशके सत्तेत राहून नेमकं काय केलं की लोकांना प्यायला पाणी नाही, चांगले रस्ते नाहीत, आरोग्य की शिक्षण सुविधा नाहीत?
- खूप कमी काळात खूप वर जाण्याची घाई करू नका. तुम्ही तुमचे अकारण वैरी त्यात निर्माण करता. तसेही जनता अशीच कुणालाही एका रात्रीत स्वीकारत नाही. असले कुठलेही प्रयत्न हे तुमच्या स्वतःच्या राजकारणासाठीच घातक असतात. वाल-हुलगे खूप भराभर वाढतात आणि एका मोसमानंतर वाळून जातात. आंबे-नारळ खूप हळू वाढतात, पण खूप उंच वाढतात आणि शंभरेक वर्ष जगतात.
- शहाणे असाल तर दमदाटी करणारे भुक्कड कार्यकर्ते, पैलवान, ट्रोल वगैरे लोक पाळणे सोडून द्या. असले अर्धवट लोक तुमच्या इमेजची कायमची माती करून टाकतात जी नंतर काहीही केल्याने भरून निघत नाही.
- पत्रकार (कितीही bias असले तरी), समीक्षक, साहित्यिक यांना विरोधी मत व्यक्त केल्यास ट्रोलकरवी शिव्या देणे, धमकावणे, मुस्कटदाबी करणे वगैरे प्रकार तर कधीही करू नका. तुमचे ट्रोल जास्तीत जास्त ५-१० हजार लोकांपर्यंत पोचतात, पण हे लोक खूप जास्त काळ व्यवस्थेमध्ये असतात आणि जास्त लोकांची मते बदलू शकतात.
- शक्य झाल्यास काही चांगली पुस्तके वाचा, साहित्यिक लोकांशी मैत्री ठेवा. त्यामुळे माणूस सुसंस्कृत आणि जास्त लोकप्रिय राहतो.
- शेवटचे व अत्यंत महत्वाचे: तुमच्यावर टीका करणारे लोक हे तुमचे सगळ्यात मोठे हितचिंतक असतात हे लक्षात ठेवा कारण ते तुमचे दोष दाखवून तुम्हाला सुधारत असतात. तुमचे स्तुतीपाठक हे सगळ्यात धोकादायक असतात कारण ते तुम्हाला आंधळे बनवतात आणि तुमची कारकीर्द लवकर संपवण्याचे काम करतात.
जिज्ञासू लोकांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, यशवंतराव चव्हाण आणि अलीकडच्या काळातील शरद पवार वगैरे मोठ्या नेत्यांचे याबाबतीतले वर्तन आणि अनुभव एकदा शोधून वाचावे.
– डॉ. विनय काटे