पुणे, ६ सप्टेंबर २०२२: पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या कैदी वार्डमध्ये घुसून हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
तुषार हंबीर हा कुख्यात गुन्हेगार असून गेले काही वर्ष तो तुरुंगात आहे. मात्र दहा दिवसांपूर्वीच त्याची तब्येत बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात कैदी वार्डमध्ये हलवण्यात आलं होतं. सोमवारी रात्री नातेवाईक असल्याचं भासवून दोनजण कैदी वार्डमध्ये शिरले आणि हंबीर याच्यावर गोळीबार केला आणि सोबत आणलेल्या तलवारी ने वार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी अमोल बागड यांनी विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत बागड हे जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. बंडगार्डन पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. मात्र अजून हल्लेखोरांना पोलीस पकडू शकलेले नाहीत.
गुंड तुषार हंबीर याच्यावर हल्ल्याची ही पहीली घटना नाही. याआधीही २०१९ मध्ये येरवडा कारागृहात कैदीच्या झालेल्या हाणामारीत तुषार हंबीर गंभीर जखमी झाला होता. हंबीर हा मोहसीन शेख खूनातला आरोपी आहे. त्यावेळी तीन मुस्लिम कैदींनी हंबीरवर प्राणघातक हल्ला केला होता. ससून रुग्णालयात झालेला हल्ला त्याच प्रकरणातून झाला असावा असा अदांज व्यक्त होत आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर