पुरंदर, दि. १५ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांनी लॉक डाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आत्ता पर्यंत तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर ३८९ लोकांवर १८८ कलमानुसार कारवाई केली असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस. हाके व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे ट्राफिक विभागाचे पोलीस नाईक ज्योतिबा भोसले व पथकाने दि. १५ मार्च ते १३ जुलै या लॉकडाऊनच्या काळात सासवड पोलीस स्टेशन कडून ५६६६ वाहनावर कारवाई कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून आत्तापर्यंत १३ लाख ५० हजार १०० रु दंड आकारून वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण फिरणारे , विना मास्क फिरणाऱ्या लोकांविरोधात भादवि कलम १८८ अन्वये ३८९ गुन्हे दाखल केले आहे. तसेच दारूबंदी संदर्भात ३५ गुन्हे व झुगार. प्रकरणी २ गुन्हे दाखल केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे अद्यापपर्यंत १६ इसमंना हद्दपार करण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी सासवड पोलिस स्टेशनचे स.पो. फौ. काळभोर, पो. हवा. माने, चिखले, बाळासाहेब गोडसे, कोकरे, पो.ना. अजित माने, खरात, कोल्हे, पो. शिपाई सरक, प्रतीक धिवार, निलेश जाधव, दत्ता जाधव, होमगार्ड, ग्रामरक्षक दलाची सदस्य यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे