पुरंदर, दि.८ जून २०२०: आठवडे बाजार सुरू झाल्याने सासवडच्या बाजारपेठेत मोठी गर्दी पहायला मिळाली. मुख्य पेठेतील दुकाने सुरू झाल्याने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र त्याचबरोबर आठवडे बाजारच्या ठिकाणी तुरळक गर्दी पहायला मिळाली. नगर परिषदेने बाजारचे विभाजन केल्याने गर्दी कमी झालेली पहायला मिळाली.
सासवड हे पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे शहर आहे. तालुक्यातील उत्तर व पश्चिम भागातील सर्वच गावांचा वावर सासवड शहरात असतो. आठवड्याची
तरकारी किराणा व शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी लोक सासवड मध्येच येत असतात. गेली तीन महिने ही बाजारपेठ पूर्ण बंद होती.पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी स्वतः लक्ष घालून लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला नाही. मात्र बाजार पेठ बंद असल्याने लोकांना अडचणीला तोंड द्यावे लागत होते. आज पासून शासनाने आठवडे बाजार सुरू करण्यात आल्याने आजच्या आठवडे बाजारात खूप मोठी गर्दी होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आठवडे बाजारात तुरळक गर्दी पहायला मिळाली. सासवड येथील मुख्य बाजार पेठेत मात्र जास्तीची वर्दळ दिसत होती. सासवड येथे नगरपरिषदेने सम-विषम तारखा नुसार दुकाने सुरू ठेवण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
सासवड येथील आठवडे बाजार शहराबाहेरील नारायणपुर रोड व वाघ डोंगर परिसरात विभागून भरवण्यात आलं असल्याने गर्दीचे विभाजन पहायला मिळाले. प्रशासनाच्यावतीने जास्तीची गर्दी होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे