पुरंदर, दि.७ जून २०२०: कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दोन महिन्यापूर्वी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील गावांमधील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता जनजीवन सुरळीत करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे. त्यामुळे गावा गावातील आठवडे बाजार काही अटी व शर्तींवर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. उद्या (सोमवार) पासून पुरंदर तालुक्यातील सासवड येथील आठवडे बाजार भरणार असल्याचे सासवड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव वाढला जावा तसेच सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात व ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा. यासाठी आठवडे बाजार सुरू होणे गरजेचे होते. हे आठवडे बाजार सुरू झाल्यावर कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची ही दक्षता घेतली जाणार आहे. यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी एक नियमावली प्रसिद्धीस दिली आहे.
आठवडे बाजारातील सर्व लोकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. आठवडे बाजाराच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल येईल. बाजारातील सर्व दुकाने व ग्राहक यांमध्ये सुरक्षित अंतर सहा फुटाचे बंधनकारक राहील.
गुटखा, पान, तंबाखू खाण्यास सक्त मनाई राहणार आहे. तसेच मध्यपान करण्यासही सक्त मनाई राहणार आहे. आठवडे बाजाराच्या ज्या भागांवर वारंवार लोकांचा हात लागणार किंवा जी जागा वारंवार हाताळली जाईल, तो भाग निर्जंतुक करणे गरजेचे राहणार आहे.
आठवडे बाजाराच्या आत व बाहेर जातेवेळी थर्मल स्क्रिनिंग करणे व हात धुणे तसेच सैनिटायझरचा वापर करणे याकरिता संबंधित ग्रामपंचायतीने व्यवस्था करणे अनिवार्य आहे. आठवडे बाजारचा वेळ, वार व पार्किंगची व्यवस्था याची स्थानिक पोलिसांच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन करावे.
आठवडे बाजारातील विक्रेत्यांना बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने खुणा करून निश्चित केल्या जातील. बाजाराच्या ठिकाणी नागरिक सामाजिक अंतराचे पालन करत नसतील, असे निदर्शनास आल्यास सदर बाजार तात्काळ बंद करण्यात येईल.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा संघटनांविरुद्ध भारतीय साथ अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, मुंबई मार्केट अॅन्ड फेअर अॅक्ट ८६२ चे कलम ७ व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाने प्रचलित इतर अधिनियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे