इंदापूर, २७ डिसेंबर २०२०: सत्यजित तांबे यांनी स्वतःची कुवत लक्षात घेऊन लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. तुमचे संधीसाधू राजकारण हे तर संपूर्ण राज्याला माहित आहे. त्यामुळे आपण ज्येष्ठ नेत्याबद्दल दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या अंकिता पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल टीकाटिप्पणी केली होती. त्यासंदर्भात बोलताना अंकिता पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी कोणी मोठे सहकार्य केले, याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवणे आवश्यक होते, मात्र हर्षवर्धन पाटील यांनी केलेले सहकार्य ते विसरले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेवर टीकाटिप्पणी करण्यापूर्वी त्यांच्या राजकीय कार्यकीर्दीएवढे आपले वय देखील नाही याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवायला हवी होती. राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचेसंदर्भात बोलताना सत्यजित तांबे यांनी राजकीय संकेत बाळगणे आवश्यक होते, असे मतही अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे