नारायणगाव, दि.३१मे २०२० : जुन्नर तालुक्यातील मनोरुग्णांचा सांभाळ करणारा सामाजिक कार्यकर्ता अक्षय मोहन बोऱ्हाडे यांस मारहाण केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर आपल्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ टाकत, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी मारहाण केली, असा आरोप केला होता. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या.त्यामुळे राज्यभरातून याचा निषेध करण्यात आला.त्यामुळे खूप खळबळ उडाली होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर आज पडदा पडला आहे.
बुधवारी ( दि.२७) दुपारी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आपणास मारहाण केली असल्याचा फेसबुक लाईव्ह अक्षय बोऱ्हाडेने केला होता, त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती अनेक संघटनांनी अक्षयला पाठिंबा दिला होता. या प्रकरणावरुन सत्यशील शेरकर व खासदार डाॅ अमोल कोल्हे यांना ट्रोल करण्यात आले होते. या प्रकरणाला राजकीय वळण लावण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर सत्यशील शेरकर यांच्यावर जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
अक्षयकडे असणाऱ्या मनोरुग्णांमूळे ग्रामस्थांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येथील काही ग्रामस्थांनी यापूर्वी केल्या होत्या. सत्यशील शेरकर यांनाही ग्रामस्थांचा पाठिंबा होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच तापले होते. अनेक शिवभक्तांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन आपल्या भावना सोशल मिडीयावरुन व्यक्त केल्या होत्या.
अक्षयच्या कामाबाबत ग्रामस्थांच्याही तक्रारी होत्या आणि त्यामुळे येथील ग्रामस्थांनी हा गावातील वाद गावातच मिटावा म्हणून ग्रामस्थांची बैठक बोलाविली होती. या बैठकीस जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला आहे.
याबाबत अक्षय बोऱ्हाडे याने सांगितले की, माझ्या काही अडचणी होत्या. त्या मी ग्रामस्थांपुढे मांडल्या व मला ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्यातील वाद आता मिटला असून मला पाठिंबा देणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मी आभार मानतो असे त्यांनी सांगितले. तर सत्यशील शेरकर यांनी हा गावातील वाद होता आमच्यातील असलेले समज गैरसमज दूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी :प्रशांत श्रीमंदिलकर