सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभाविप चे थाळी बजाओ आंदोलन यशस्वी!

महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये थाळी बजाओ आंदोलन यशस्वी ठरले आहे. या आंदोलनाच्या जोरावर विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचे आश्वासन दिले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधीच शुल्क भरले आहे त्यांना परतावा दिला जाईल, असे विद्यापीठाने लेखी स्वरूपात मान्य केले आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागात शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे व नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत आणि या भागात अतिवृष्टीने प्रचंड तडाखा दिला आहे. दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पुनर्वसन झालेल नाही.

या पार्श्वभूमीवर आजच्या आंदोलनात मुख्यतः सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे तसेच पूर्वी भरलेले शुल्क परत करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाने लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले की सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ केले जाईल.

पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हानकर यांनी सांगितले की, जर लवकरात लवकर अंमलबजावणी झाली नाही, तर अभाविप अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी गुरुराज