Controversy breaks out at Pune University: पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या इतिहासात शनिवारी (दि. २२) अभूतपूर्व राडा झाला. अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य एकमेकांवर धावून गेल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. व्यवस्थापन परिषदेच्या महिला सदस्यांबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी सभागृहात ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे अधिसभेचे कामकाज दीड तास ठप्प झाले.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेला सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहात सुरुवात झाली. सुरुवातीलाच, अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले. अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांनी महिला सदस्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप केला, तसेच भ्रष्टाचाराचे आरोपही केले.
या आरोपांमुळे व्यथित झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकारीवर्गानेही या आरोपांवर नाराजी व्यक्त केली. यामुळे विद्यापीठातील कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी सभागृहात उतरून घोषणाबाजी सुरू केली.
या गोंधळामुळे अधिसभेचे कामकाज दीड तास ठप्प झाले. कुलगुरू डॉ. गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. काळकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी गोरडे यांच्या निलंबनाची मागणी केली. अखेर, गोरडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे