नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२२: स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण भारत अमृत महोत्सव (आझादी का अमृत महोत्सव) साजरा करत आहे (India@75). दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. वास्तविक, SBI ने आपला मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) २० बेस पॉईंटने वाढवला आहे. यानंतर बँकेकडून कर्ज घेणे आणखी महाग होईल. नवीन दर 15 ऑगस्ट २०२२ पासून लागू होतील.
आरबीआयच्या निर्णयानंतर घोषणा
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वेबसाइटनुसार, विविध कालावधीच्या कर्जासाठी MCLR दर वाढवण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली होती.
बदलानंतरचे नवीन दर खालीलप्रमाणे आहेत
स्टेट बँकेच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर आता एक रात्र ते तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर ७.१५ टक्क्यांवरून 7.35 टक्के झाला आहे. तर, सहा महिन्यांच्या मुदतीच्या कर्जावर ते ७.४५ टक्क्यांवरून ७.६५ टक्के करण्यात आले आहे. एक वर्षाच्या कर्जावरील एमसीएलआर दर ७.५० टक्क्यांवरून ७.७० टक्के आणि दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७.७० टक्क्यांवरून ७.९० टक्के करण्यात आला आहे. याशिवाय तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा दर ७.८० टक्क्यांवरून ८.०० टक्के करण्यात आला आहे.
तीन महिन्यांत तिसऱ्यांदा धक्का
एसबीआयच्या ग्राहकांना गेल्या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा बँकेकडून झटका बसला आहे. स्टेट बँकेने मे पासून MCLR 50 bps ने वाढवला आहे. MCLR दरांसह, SBI ने बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ५० bps ने वाढवले आहेत. हे दरही १५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. यापूर्वी एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट आणि कॅनरा बँकेनेही हे दर वाढवले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे