पुरंदर, दि. २७ जून २०२०: यशवंत निवारा घरकुल योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजनेमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी काल दि. २६ रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनांमध्ये स्वतःला कोंडून घेऊन आंदोलन केले होते. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी स्वतः पंचायत समितीमध्ये पहिल्यांदाच येऊन सुरेखा ढवळे यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले.
पुरंदर तालुक्यामध्ये सन २०१८-१९ मध्ये ३३ अपंग घरकुल मंजूर झाली होती. त्यापैकी ९ अपंग घरकुल अपात्र करण्यात आली यामध्ये सतीश घाटे यांच्या घरकुलाचा ग्रामपंचायत मध्ये निधी वर्ग करण्यात आला होता. परंतु हा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग न झाल्याने दप्तर दिरंगाई झाली. त्याचबरोबर निरा येथील एक लाभार्थी दिव्यांग नसताना बेघर दाखवून त्याला घरकुल मंजूर करण्यात आले. भोसलेवाडी येथील दोन दिव्यांग व्यक्ती असताना यापूर्वी वडिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला असून त्यांना देखील पुन्हा घरकुल मंजूर करण्यात आले. एकाच कुटुंबात दोन घरकुले मंजूर निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता. त्यापैकी एका दिव्यांगाला अपात्र केले मात्र त्याची रक्कम कोणत्या खात्यामध्ये ठेवली आहे. याचा हिशोब मात्र लागेना.
त्याचबरोबर अपंगांसाठी दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता हा सन २०१७-१८-१९ या तीन वर्षांमध्ये १५ दिव्यांगांना दोन वेळा लाभ देण्यात आला तर एका दिव्यांगाला बारामती तालुक्यामध्ये राहत असताना घरकुल बारामतीच्या पंचायत समितीकडून घेतले व उदरनिर्वाह भत्ता हा पुरंदर पंचायत समिती कडून वर्ग करण्यात आला आहे. या निधीचा अपहार झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये एका अपंगांसह प्रहार अपंग क्रांती आंदोलन राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी स्वतःला कोंडून घेतले होते.
यावेळी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. तर यावेळी पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, उपसभापती दत्तात्रेय काळे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार, हरिभाऊ लोळे, अमोल बनकर उपस्थित होते.
आमदार संजय जगताप यांची मध्यस्थी या आंदोलनाची माहिती आमदार संजय जगताप यांना मिळताच त्यांनी पंचायत समिती कडे तातडीने धाव घेत सुरेखा ढवळे यांच्याशी सविस्तर चर्चा करून दोन दिवसांमध्ये
अधिका-यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे