SCERT Maharashtra Launches Career Card for 9th,10th Students: शालेय शिक्षण केवळ पुस्तकी न राहता ते खऱ्या अर्थाने रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘करिअर कार्ड’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे, ज्यामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यास मोठी मदत होणार आहे.
हे ‘करिअर कार्ड’ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक असेल, ज्यात १३ प्रमुख क्षेत्रांमधील ५०० हून अधिक रोजगारांची सविस्तर माहिती समाविष्ट आहे. यामध्ये केवळ रोजगारांची नावे नसतील, तर त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, कामाचे स्वरूप, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि संबंधित अभ्यासक्रमांचीही माहिती उपलब्ध असेल.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “महापालिका शाळांमधील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर कार्ड हे दिशादर्शक ठरेल. भविष्यातील करिअरसाठी नेमके कोणते क्षेत्र निवडावे या विचाराने विद्यार्थ्यांचा जो गोंधळ होतो, तो या कार्डमुळे दूर होईल. उलट, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे आणि योग्य करिअर निवडण्यास यामुळे मदत मिळेल.”
हे ‘करिअर कार्ड’ लवकरच शाळांमध्ये वितरित केले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या निवडीसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्याची संधी मिळेल. शिक्षकांना आणि समुपदेशकांनाही या कार्डचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मार्गदर्शन करता येईल. सध्या हे कार्ड भाषांतराच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते SCERT च्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले जाईल. ‘करिअर कार्ड’मुळे विद्यार्थी आता अधिक स्पष्टतेने आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































