पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर, शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

पुणे, ८ सप्टेंबर २०२२: पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २२ सप्टेंबरपर्यंत हे निर्बंध लागू केले आहेत. ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये निर्बंध लागू केले आहेत.

निवडणूक जाहीर झालेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता अमलात आली असून १८ सप्टेंबरला मतदान तर १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याची तारीख २२ सप्टेंबर अशी असून या तारखेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त बंदुका, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील

मतदानाचा दिवस ते मतमोजणीचा दिवस या कालावधीत मतदान केंद्राच्या परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा