पुणे, 13 जुलै 2022: हवामान खात्याकडून पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. याला अनुसरून काल आणि आज पुण्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यातील सर्व मुख्य रस्ते पाण्याने ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडं धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याची खबरदारी घेत उद्या पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत असं म्हटलं आहे की, मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीची शक्यता या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. 14 जुलै, 2022 रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज!
• महापालिकेच्या मुख्य भवनात 24 तास कार्यान्वित असणारा पूरनियंत्रण कक्ष सुरु
• सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्येही पूरनियंत्रण कक्ष स्थापन
• तात्पुरती निवारा केंद्रेही उभारण्यात आली
• पुरामुळे बाधित होणारी संभाव्य 278 ठिकाणे निश्चित, नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराचे नियोजन
• धोकादायक ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर
• नदीपात्रासह नाल्यांवर बसविले पूर संवेदक (फ्लड सेन्सर)
• मदत केंद्रांवर पिण्याचे पाणी, जेवण, फिरती स्वच्छतागृहे, वीज आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे