मुंबई: गेल्या वर्षी अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे अध्यक्षपद सोडले होते. त्यांच्या जागी चिरंजीव रिशद प्रेमजी यांची विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सेबीचा नवा नियम विप्रोसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. यामुळे विप्रोला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सेबीचा नवा नियम विप्रोची डोकेदुखी वाढवणार असून कंपनीचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी यांना पद सोडावे लागण्याची शक्यता आहे. रिशद प्रेमजी हे विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे चिरंजीव आहेत.
या नवीन नियमानुसार आघाडीच्या ५०० सूचिबद्ध कंपन्यांना अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद एकाच व्यक्तीकडे असू नये. सेबीची ही नवी नियमावली येत्या एप्रिलपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे रिशद प्रेमजी यांना कंपनीचे कार्यकारी अध्यक्षपद सोडावे लागण्याची शक्यता आहे. प्रेमजी कुटुंबीयांचे विप्रोतील निर्णय प्रक्रियेतील वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. प्रेमजी कुटुंबीयांची विप्रोमध्ये ७४ टक्के हिस्सेदारी आहे.