समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू, नाशिकहून नागपूर अवघ्या ६ तासात

नाशिक, २७ मे २०२३: समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी (२६ मे) करण्यात आले. यानंतर आता नाशिकच्या भरवीर ते नागपूर हा प्रवास अवघ्या ६ तासांत पूर्ण करता येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शिर्डीत पार पडले. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

पहिला टप्पा ५०१ किलोमीटरचा होता, आता शिर्डी ते भरवीर (नाशिक) हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर (नाशिक) ६०० किलोमीटरपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग शिर्डी ते भरवीर (नाशिक) असा ८० किलोमीटरचा असून या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. आता शिर्डी ते भिवंडी या मार्गाचे काम सुरू झाले आहे. सिन्नर ते कसारा दरम्यान १२ बोगदे आणि १६ छोटे पूल बांधले जाणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमणे गावापर्यंतचा शेवटचा टप्पा डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर मुंबई पूर्णपणे समृद्धी महामार्गाशी जोडली जाईल.

दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गाने राज्यातील १५ जिल्ह्यांचे नशीब बदलेल. आतापर्यंत केवळ मुंबई आणि पुण्यातच विकासकामे होत होती, मात्र आता हा विकास गोंदियापर्यंत पोहोचणार आहे. उद्योग-व्यवसाय असो की शेती असो, समृद्धी महामार्गामुळे प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने आर्थिक विकास होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा