मुंबई: जगातील १८६ देशांमध्ये कोरोना विषाणूचा सरसर्ग झाला आहे. या धोकादायक संसर्गाचा परिणाम भारतात वेगाने वाढत आहे. देशातील परिस्थिती बिघडू देऊ नका, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक कर्फ्यू लावण्याची विनंती केली आहे. देशात जनता कर्फ्यू लागू आहे. रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत सार्वजनिक कर्फ्यू असेल. महाराष्ट्रातील परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज मध्यरात्रीपासूनच राज्यात कलम १४४ लागू होणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
महत्त्वाचं काम नसेल तर ९ वाजल्यानंतर ही बाहेर पडू नका असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असून सर्वधर्माचे प्रार्थनास्थळ बंद राहणार आहेत. या शिवाय एसटी, खासजी बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची सेवा फक्त सुरु राहणार आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या विमानांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
उद्या सकाळपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व नागरी भागांत १४४ लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ राज्यात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आता आपण अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. जी जिद्द आज आपण दाखविली, ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद करीत आहोत.