High security number plate controversy: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असताना, सरकारला वाहनांच्या ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ची चिंता सतावतेय, यावरून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्यात परभणी, बीड, पुणे, जालना यांसारख्या ठिकाणी हिंसाचार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री असतानाही, राज्यात असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर, सरकारने वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, डॉ. आढाव यांनी या निर्णयाला क्रूर उपहास म्हटले आहे. “आधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारा, मग वाहनधारकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या,” असे त्यांनी सरकारला सुनावले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर प्रवासी व मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीने ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’च्या विरोधात निदर्शने केली. त्यावेळी डॉ. आढाव बोलत होते.


निवडणुकीत लोकप्रिय घोषणा करून शासकीय तिजोरीतून वारेमाप खर्च केला. उपलब्ध महसुली साधनातून त्याची भरपाई होऊ शकत नसल्याने प्रवासी आणि मालवाहनधारकांकडून उच्च सुरक्षा नंबरप्लेट, वाहनांची तपासणी करून केले दंड करून सरकार महसूल गोळा करत आहे. महसूल गोळा करण्यासाठी वाहनधारकांना सतत वेठीला धरले जात आहे, असे नितीन पवार आणि बाबा शिंदे यांनी सांगितले.
गुंडांना आवर घालण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे. पण राज्यकर्तेच गुंडगिरी करू लागल्यावर सामान्य जनतेने काय करायचे? असा सवाल डॉ. आढाव यांनी विचारला.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे