Importance of seed treatment before Kharif: यावर्षीचा खरीप हंगाम जवळ आला असून, शेतकरी बांधवांनो दर्जेदार आणि भरघोस उत्पादनासाठी आत्तापासूनच कंबर कसा! पेरणीपूर्व तयारीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बीजप्रक्रिया होय. चांगल्या उत्पादनासाठी बियाणे दर्जेदार असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, या खरीप हंगामात शुद्ध, योग्य, निरोगी आणि दर्जेदार बियाण्यांचा वापर करण्यावर भर द्या.
सुधारित आणि संकरित वाणांचे बियाणे खरेदी करताना शासकीय यंत्रणा किंवा कृषी विद्यापीठांच्या विक्री केंद्रांना प्राधान्य द्या. बियाणे खरेदी करताना पावती घेणे विसरू नका. अनेकदा बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. या पावतीवर बियाण्यांच्या किमतीसह सर्व तपशील असल्याची खात्री करा आणि बियाण्यासोबत येणारा टॅगही जपून ठेवा. उगवण न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करताना पावती आणि टॅग महत्त्वाचे ठरतात, असे कृषी सहायक अक्षय ढुमणे यांनी सांगितले.
बीजप्रक्रियेसाठी बियाणे, बुरशीनाशके, अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, सल्फर (गंधक) आणि पाणी यांसारख्या साहित्याची आवश्यकता असते. बियाण्यांची उगवणशक्ती तपासण्यासाठी पेरणीपूर्वी किमान १५ दिवस आधी बियाणे खरेदी करा. १०० दाणे घेऊन शेतातील मातीत कुंडीत पेरून त्यांची उगवणशक्ती तपासा. १० दिवसांत किती कोंब येतात, यावरून बियाण्यांची उगवणशक्ती टक्केवारी काढता येते.
बीजप्रक्रियेचे फायदे अनेक
यामुळे बियांची उगवणक्षमता वाढते, रोपांची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पिकांच्या उत्पादनात वाढ होते आणि रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते. जैविक, रासायनिक आणि कीटकनाशकांचा वापर करून ही प्रक्रिया केली जाते. या महत्त्वपूर्ण टिप्सचा अवलंब करून, या खरीप हंगामात प्रत्येक शेतकरी बांधवाने दर्जेदार उत्पादन मिळवावे हीच सदिच्छा!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































