रत्नागिरी, २१ फेब्रुवारी २०२३ : पायाने अधू असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना एखाद्या किल्ल्यावर जाणे म्हणजे फारच त्रासदायक गोष्ट असते. त्यात अगदी व्हीलचेअर वापरणाऱ्यांना तर ही गोष्ट म्हणजे अशक्यच; परंतु रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या सदस्यांनी दिव्यांग महिलांना रत्नदुर्ग किल्ल्यावर व्हीलचेअरवरून नेले आणि त्यांनी भगवती देवीचे दर्शन घेतले; अथांग समुद्र पाहिल्यानंतर अत्यानंद व्यक्त केला.
अहमदनगर येथील अनामप्रेम संस्थेच्या स्वयंचलन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये उद्योजिका व व्हीलचेअर वापरकर्त्यांची प्रेरणा असलेल्या राजश्री पाटील आणि व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू कोमल माळी यासुद्धा होत्या. त्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेनंतर आयोजक रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी समुद्रकिनाऱ्यावर सैर किंवा किल्ला दर्शनासाठी त्यांना सुचविले. रत्नदुर्ग किल्ल्यावर व्हीलचेअर घेऊन जायचे कसे? असा प्रश्न पडला होता. किल्ल्यावर मुख्य दरवाजाने आता जाण्याकरिता सुमारे चाळीस पायऱ्या चढाव्या लागतात. हे अशक्य होते; परंतु सादिक नाकाडे यांचे बंधू व संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांनी राजश्री पाटील व कोमल माळी यांना व्हीलचेअरवर बसवूनच पायऱ्यांवरून वर नेले. या व्हीलचेअरच्या मागे उभे राहून योग्य तंत्राने खेचत, ताकदीने वर नेल्या. याकरिता संस्थेच्या सदस्यांचेही सहकार्य लाभले.
अध्यक्ष सादिक नाकाडे हेसुद्धा व्हीलचेअर वापरतात. तीनचाकी व चारचाकी गाडीसुद्धा चालवितात. समीर नाकाडे यांनी सादिकभाईंना यापूर्वी अनेकदा व्हीलचेअरवरून योग्य प्रकारे तंत्र वापरून पायऱ्यांवरून वर नेले असून, खालीसुद्धा आणले आहे. त्यामुळे या सरावाचा उपयोग समीर नाकाडे यांना झाला. किल्ल्यावर पोचल्यानंतर राजश्री पाटील व कोमल माळी यांनी भगवतीचे दर्शन घेतले आणि किल्ल्यावरून दिसणाऱ्या अथांग समुद्राचे दर्शन घेतले व अशक्य गोष्ट शक्य झाल्यामुळे त्यांना अत्यानंद झाला. यावेळी अनामप्रेम संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश शेठ, समन्वयक योगिता काळे, सहायक अभिषेक भगेकर, उमेश पंडुरे, विद्या रानवडे हेसुद्धा उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मार्गदर्शन, सहकार्यासाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सादिक नाकाडे यांनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे