सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवा, नाही तर २६/११ सारख्या हल्ल्यासाठी तयार रहा, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

7

मुंबई, १४ जुलै २०२३ : चित्रपटाला साजेशी प्रेम कथा आणि नंतर लग्न केलेले सीमा हैदर हे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांना धमकी मिळाली आहे. सीमा हैदर प्रकरणावरुन थेट मुंबई पोलिसांनाच धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. सीमा हैदरला पाकिस्तानात पुन्हा पाठवले नाही तर २६/११ सारख्या हल्ल्यासाठी तयार रहा, अशी धमकी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आली आहे. तसेच याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असल्याचे फोन करणाऱ्याने म्हटले आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या फोनबाबत सखोल चौकशी करत आहेत. याआधीही मुंबई पोलीस कंट्रोल रुमला असे कॉल आले होते.

मुंबई पोलिसांना धमकी देणारा उर्दू भाषेत बोलत होता. जर सीमाला पाकिस्तानात परत पाठवले नाही तर भारताचा नाश होईल. २६/११ प्रमाणे हल्ल्यासाठी तयार रहा, अशी धमकी देण्यात आली आहे. १२ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला हा कॉल आला होता.

सीमा हैदर १३ जुलै रोजी पाकिस्तानातून नोएडात आपल्या प्रियकराकडे पोहोचली. यानंतर दोघेही नोएडात भाड्याच्या घरात राहू लागले. पाकिस्तानातून महिला भारतात आल्याची माहिती उघड होताच पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र त्यानंतर जामीनावर दोघांची सुटका करण्यात आली.

याआधी १० मार्च रोजी ती नेपाळला आली होती. दोघांनी नेपाळमध्ये मंदिरात लग्न केल्याचा दावा केला आहे. यानंतर ती पाकिस्तानला परत गेली.मात्र तिला सचिन सोबत रहायचे होते, म्हणून ती १० मे रोजी पुन्हा पाकिस्तानातून निघाली. शारजाह, काठमांडू,पोखरा, दिल्ली असा प्रवास करत १३ जुलै रोजी नोएडात पोहचली. नोएडात सचिन तिची वाट पाहत होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा