ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं मंगळवारी पुण्यात निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. यामध्ये ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ’, ‘दे दणादण’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली. १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा