पुणे, ८ डिसेंबर २०२२ : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील (वय ८२) यांचे
बुधवारी (ता. सात) रात्री निधन झाले. शनिवारी (ता. तीन) तब्येत बिघडल्याने त्यांना कोल्हापूरच्या राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
शिक्षण, अर्थशास्त्र, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत डॉ. जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख, इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष, भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांची मराठी, इंग्रजी भाषेतील अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून विविध वृत्तपत्र, मासिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
डॉ. पाटील यांचे मूळ गाव सांगली येथील नांद्रे हे आहे. नोकरीच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले अन् कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी बनली. त्यांनी शिवाजी विद्यापीठासह अनेक सामाजिक संस्था; तसेच शासनाच्या विविध मंडळांवर सदस्य म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी कमल, मुलगा अभिनंदन, मुलगी राजलक्ष्मी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना सर्व क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील