ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांचं निधन

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२० : ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांचं दीर्घ आजारानं रात्री साडेबारा वाजता निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबईतल्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीतल्या विद्युतदाहिनीत कोणत्याही धार्मिक विधींशिवाय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई हिरिरीने सहभागी झाल्या होत्या.मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या.

स्त्रीवादी चळवळींची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा