गर्भाशयाच्या आरोग्यावर गंभीर धोका, महिलांनी योग्य काळजी घेणे अत्यावश्यक

26

पुणे २७ जानेवारी २०२५ : बदलती जीवनशैली आणि अयोग्य सवयींमुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः गर्भाशयाशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. 23 ते 50 वयोगटातील महिलांना याचा अधिक त्रास होत असून गर्भाशयाचा कॅन्सर, पाळीतील अनियमितता, आणि योनीमार्गातील संसर्ग यांसारख्या समस्या दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते महिलांनी योग्य काळजी घेतल्यास या समस्यांवर मात करता येऊ शकते.

आजार कशामुळे होतात?

महिलांच्या शरीरातील स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष हे गर्भाशयाच्या आजारांचे प्रमुख कारण ठरते. प्लास्टिकच्या डब्यांमध्ये जेवण करणं, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं, आणि केमिकलयुक्त हायजीन प्रोडक्ट्सचा वापर या सवयी शरीरावर विपरित परिणाम करतात. प्लास्टिकमधील रसायनांमुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि गर्भाशयावर थेट परिणाम होतो.

मासिक पाळीदरम्यान स्वस्त व निकृष्ट दर्जाच्या सॅनिटरी पॅड्सचा वापर योनीमार्गातील जंतूसंसर्ग वाढवतो. तसेच, पीसीओडी आणि पीसीओएस यांसारख्या विकारांमुळे मासिक पाळीचं चक्र बिघडतं, ज्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

गर्भाशयाच्या आजारांची प्रमुख कारणे:

  1. प्लास्टिकच्या डब्यांचा नियमित वापर.
  2. केमिकलयुक्त हायजीन प्रोडक्ट्सचा अतिरेक.
  3. चुकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार.
  4. स्थूलपणा, तणाव आणि हार्मोनल असंतुलन.
  5. स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको!

गर्भाशयाशी संबंधित आजारांची काही लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचे आहे.

पांढऱ्या पाण्याचा त्रास.

पाळीत जास्त रक्तस्राव होणे.

ओटीपोटात वेदना किंवा सूज येणे.

संबंधावेळी होणारा रक्तस्राव.

मळमळ, उलट्या, किंवा ताप येणे.

कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गर्भाशय काढण्याची वेळ येऊ शकते.

काळजी कशी घ्यावी?

महिलांनी आरोग्याबाबत सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते खालील सवयी अवलंबिल्यास गर्भाशयाशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात:

  1. आहारात हिरव्या पालेभाज्या, प्रथिने, आणि जीवनसत्त्वांचा समावेश करा. साखरयुक्त पदार्थ टाळा.
  2. योनीमार्गाची स्वच्छता साध्या पाण्याने करा. केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर टाळा.
  3. दिवसाला 3 ते 6 लिटर पाणी प्या. प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्यांचा वापर करा.
  4. नियमित योगा व व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवा.
  5. नेहमी सुती कपडे घाला आणि त्वचेला स्वच्छ व श्वास घेण्यासारखे वातावरण द्या.

तज्ज्ञांचा सल्ला:

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगेश गाडेकर म्हणतात, “महिलांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी तपासणी व उपचार केल्यास गंभीर स्थिती टाळता येते. जीवनशैलीत बदल करून संतुलित आहार, नियमित स्वच्छता आणि व्यायामाचा अवलंब केला पाहिजे. तसेच, योग्य सॅनिटरी पॅड्सचा वापर व डॉक्टरांचा वेळेवर सल्ला यामुळे गर्भाशयाच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.”

महिलांनी आरोग्याची काळजी घेणे का आवश्यक आहे?

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांनी आरोग्याबाबत जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियमित तपासण्या आणि योग्य काळजी घेतल्यास गर्भाशयाच्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो. वेळेवर योग्य उपाय योजल्यास महिलांचे आरोग्य चांगले राहू शकते आणि त्यांचे दीर्घायुष्य सुनिश्चित होऊ शकते

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा