इम्फाळ, मणीपूर २२ जून २०२३: मणीपूरमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरुच आहे. आज सकाळी इम्फाळमध्ये गोळीबाराची घटना घडली. अज्ञात बंदूकधारी आणि आसाम रायफल्समध्ये चकमक झाल्यानंतर सुरक्षा दल सतर्क झाले. दरम्यान मणीपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी २४ जून रोजी, दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील उत्तर बोलजंग भागात आज पहाटे पाच वाजता, अज्ञात बंदूकधारी आणि आसाम रायफल्सच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी सायंकाळी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील उरंगपतजवळ स्वयंचलित शस्त्रांच्या गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सायंकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हरोथेलच्या दिशेने गोळीबार केल्याचे स्थानिकांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत नवी दिल्लीत २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि सर्व विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींसोबत, २४ जून रोजी नवी दिल्लीत दुपारी तीन वाजता चर्चा करणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर