जुन्नर तालुक्यात चित्रनगरी प्रकल्प उभारा: खासदार डॉ.अमोल कोल्हे

पुणे, दि.२१ मे २०२०: माझ्या मतदार संघातील माळशेज परिसरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण होते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी प्रकल्प राबवा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.

लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाट्य, चित्रपट व मालिका निर्मात्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती.

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, रोजगाराच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसह इतर ठिकाणी देखील चित्रिकरण करण्यासाठी चित्रनगरी प्रकल्प राबवता येऊ शकेल. कोल्हापूर प्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण जुन्नर लगतच्या माळशेज परिसरात होत असते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी उभारण्यात यावी अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.
पुणे – लॉकडाऊनमुळे संपूर्ण हंगाम बुडाल्याने अडचणीत आलेल्या तमाशा फडमालकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाट्य, चित्रपट व मालिका निर्माते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान डॉ. कोल्हे यांनी ही मागणी केली.

तमाशा व्यवसायाचा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या काळात यात्रा-उत्सवांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तमाशा कार्यक्रमातून फडांचा वर्षभराचा खर्च भागवला जातो. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या यात्रा-उत्सवांना प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे तमाशाचा संपूर्ण हंगाम बुडाला. परिणामी तमाशाचे फड, त्यात काम करणारे कलावंत त्यांचे कुटुंबीय आदींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे, याकडे डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.

आर्थिक अडचणीत असलेल्या फड मालकांना आर्थिक आधार दिला नाही तर महाराष्ट्राची परंपरा असलेली ही लोककला धोक्यात येईल अशी भीतीही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा